शपथविधी सोहळ्यासाठी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात, वाहतुकीत बदल
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात आज आझाद मैदानात होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांची बुधवारी विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे ते आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तसंच, दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. या शपथविधी सोहळ्याला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने आझाद मैदान व आसपासच्या परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसराभोवती व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मोठ्या संख्येने नागरिक, मान्यवर आणि अति महत्त्वाचे व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना शहरात कडक सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी किमान पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ पोलिस उपायुक्त आणि २९ सहायक पोलिस आयुक्त तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ५२० पोलीस अधिकारी आणि साडेतीन हजार कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. सोहळ्यादरम्यान वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, ३० पोलीस अधिकारी आणि २५० इतर कर्मचारी यांचा समावेश असलेली टीम नियुक्त केली जाईल.
“मुंबई पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विस्तृत सुरक्षा योजना आखली आहे”, असं मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून, राज्य राखीव पोलीस दल पलटण, क्विक रिस्पॉन्स टीम, दंगल-नियंत्रण पथके, डेल्टा, लढाऊ आणि बॉम्ब शोध आणि निकामी पथके यासारख्या विशेष तुकड्याही महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केल्या जातील. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार महानगरपालिका मार्ग:- छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन ) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही वाहिन्या बंद ठेवण्यात येतील. तेथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी एल. टी. मार्ग, चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज – जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.