पुण्यातील बाणेरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून तीन तरुणी ताब्यात; मसाज पार्लर चालकावर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे दिवसेंदिवस गुन्हेगारीकडे चालले आहे.अनैतिक धंदे वाढत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील बाणेर या परिसरातील मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले, तसेच मसाज पार्लरच्या चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मसाज पार्लरचा चालक सताउद्दिन मोहम्मद दिलावर हुसेन (वय २२, रा. जुनी सांगवी) याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील बेकायदा व्यवसाय, जुगार, मटका अड्डे, तसेच मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. आदेश धुडकावून काही जण बेकायदा व्यवसाय करत असून, बाणेर भागात ‘मून थाई स्पा येथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. मसाज पार्लरचा चालक तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली