राज कुंद्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास पाठवले समन्स

Spread the love

राज कुंद्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास पाठवले समन्स

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या अनेक ठिकाणांवर अंमलबजावणी संचनालयाने नुकतेच छापे टाकले होते. यानंतर आता अंमलबजावणी संचनालयाने राज कुंद्रा यांना हाय-प्रोफाइल पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचनालयाने उद्योगपती राज कुंद्रा यांना आज सकाळी ११ वाजता मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणातील इतरांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी जुलै २०२१ मध्ये राज कुंद्रा यांना अश्लील कंटेंटची निर्मिती आणि त्याचे वितरण केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. आता अंमलबजावणी संचनालय पॉर्न फिल्मच्या निर्मिती आणि विक्रीतून मिळालेल्या कमाईची चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचनालयाने तपासाचा भाग म्हणून नुकतेच या प्रकरणाशी संबंधित मुंबई आणि उत्तर प्रदेशातील सुमारे १५ ठिकाणांवर छापे टाकले होते.

२०२१ मध्ये अनेक महिलांनी आरोप केले होते की, त्यांना वेब सिरीज आणि चित्रपटांच्या ऑडिशनच्या नावाखाली अश्लील कंटेंटच्या चित्रिकरणास भाग पाडले गेले. यानंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांच्या विरोधात तपास सुरू केला होता. या महिलांनी पुढे दावा केला होता की, त्यांना शूटिंग पूर्ण करण्यासाठी धमकावण्यात आले आणि दबाव आणला गेला. पुढे हा कंटेंट हॉटशॉट्स, हॉटहिट मूव्हीज सारख्या सबस्क्रिप्शन आधारित मोबाइल ॲप्स आणि हॉठीमुव्हीज आणि न्यूफ्लिक्स सारख्या वेबसाइटवर अपलोड केला गेला. अंमलबजावणी संचनालयाने नुकतेच टाकलेल्या छाप्यानंतर राज कुंद्रा यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले होते की, “या प्रकरणात सध्या सुरू असलेल्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon