नाशिक हादरलं ! महिलांकडून डोळ्यात मिरचीची पूड, तर टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता तर पंचवटी परिसर खुनाच्या घटनेने हादरला आहे. रविवारी रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास किरकोळ कारणातून टोळक्याकडून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विशांत भोये (२९) असे या मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील पंचवटीमध्ये रविवारी रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास बिडी कामगारनगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ विशांत भोये आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. यावेळी त्याठिकाणी अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी विशांत व त्याच्यासोबत उभ्या असलेल्या मित्रांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने विशांतवर हल्ला केला. यातील एका संशयिताने विशांतला थेट कोयत्याने छातीवर वार केला. यावेळी विशांत जमिनीवर धारातीर्थ पडला. विशांतला त्याच्या मित्रांनी तत्काळ उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या छातीवर वर्मी घाव लागल्याने डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून किरकोळ वाद झाला होता, त्यातून खून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.