गोराईच्या जंगलात अज्ञात व्यक्तीचा छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडल्याने खळबळ; गोराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईत गोराई बीच परिसरातील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा तुकड्यांमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह एकूण ७ तुकड्यांमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. गोराई पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या जंगलसदृश भागात हा मृतदेह सापडला. या मृतदेहाचे डोके, हात-पाय आणि धड वेगवेगळे करण्यात आले होते. मृतदेहाचे एकूण ७ तुकडे सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याचा पोलीस तपास करत आहेत.
गोराईच्या बाबर पाडा येथील पिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या रस्त्यावर शेफाली नावाच्या एका गावाजवळ काही दिवसांपासून दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता त्यांना जे आढळलं ते थरकाप उडवणारं होतं. गोराई बीच येथे असलेल्या जंगल परिसरात झुडपांमध्ये नागरिकांना एक गोणी आढळली. यामध्ये मृतदेह असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना तातडीने याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी ही गोणी उघडली तेव्हा त्यामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात विविध अवयव भरुन ठेवल्याचे आढळून आले. या मृतदेहाचे एकूण सात तुकडे करण्यात आले होते. या घटनेमुळे गोराई परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोराई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोणीत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. जेणेकरुन पुढील माहिती मिळवण्यास मदत होईल. या व्यक्तीची हत्या कोणी केली असावी, त्याचे कारण काय असावे, या सगळ्याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरु आहे.