दोन वर्षांच्या चिमुरड्याची ९ वर्षांच्या मावस भावाकडून हत्या; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
नाशिक – नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरामधील लेंडी नाला येथे एका दोन वर्षाच्या चिमुकल्याची मावस भावाकडून गळा आवळल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याची त्याच्या ९ वर्षांच्या मावस भावाने गळा दाबून हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांचा चिमुरडा हा माती खात होता. यातूनच नऊ वर्षांच्या मावस भावाने त्याची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मावस भाऊ त्याला माती खाण्यापासून रोखत होता. तो त्याच्यावर रागावला. मात्र तरीही दोन वर्षांचा चिमुरडा माती खाणं थांबवत नसल्याने त्याचा गळा आवळला. यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.
चिमुरड्याचे आई-वडील शेतावर काम करत असताना मुलाला त्याच्या मावस भावाकडे सांभाळण्यासाठी ठेवलं होतं. यादरम्यान हा सगळा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात मृत मुलाच्या अल्पवयीन मावस भावा विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.