गुरू शिष्याच्या नात्याला कलंक ! छत्रपती संभाजीनगरात शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार, गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर – राज्यात दिवसेंदिवस मुली व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कायद्याचा धाक उरलेला दिसत नसून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच घटना छत्रपती संभाजीनगर परिसरातून समोर आली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १३ वर्षीय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केला. याप्रकरणी पैठण शहरातील वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तसेच आरोपी शिक्षकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जगन्नाथ गोरडे असे आरोपीचे नाव असून तो खो-खो खेळाचे प्रशिक्षण देतो. तर, पीडिताची राष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळासाठी निवड झाली असून ती आरोपीकडे प्रशिक्षण घेते. आरोपीने पीडिताला मुंबईला ट्रेनिंगसाठी जायचे आहे, असे सांगून तिला रेल्वे स्थानकावर बोलवून घेतले. त्यानंतर तिला जवळच्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तो पीडिता शिकत असलेल्या शाळेत गेला आणि तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. परंतु, पीडिताने नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने संपूर्ण गावात तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. आरोपीच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून पीडिताने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर पीडिताच्या आईने वेदांतनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.