नाशकात दोनशे कोटींचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची ९४ लाखांचा फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशकात दिवसेंदिवस फसवणूकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशीच एक घटना घडली आहे. इथेनॉल प्रोजेक्टसाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून चार जणांनी एका दाम्पत्याची ९४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेणुका प्रशांत भावसार (वय ४०, रा. साईसृष्टी अपार्टमेंट, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी पंकज प्रशांत भावसार (वय ४०, रा. यशवंत हाईट्स, पिंप्राळे, जि. जळगाव), क्षमा अब्दुल पिंजारी (रा. कुर्ला, मुंबई), किरण चौधरी (रा. दीक्षितवाडी, जळगाव) व विदेशपाल सिद्धू (रा. घाटकोपर, मुंबई) यांनी संगनमत करून ऑक्टोबर २०२३ मध्ये फिर्यादी रेणुका भावसार यांच्याशी संपर्क साधला. भावसार यांना इथेनॉल प्रोजेक्टसाठी पैशांची गरज होती. ही बाब हेरून आरोपी पंकज भावसार याने स्वतःची कर्ज फाईल तयार करण्यासाठी व फिर्यादी भावसार यांना इथेनॉल प्रोजेक्टसाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज भारतीय विश्वकर्मा जनहित सेवा समिती ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मंजूर करून देतो, असे सांगितले.
त्यानुसार आरोपींनी भावसार दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने आरोपींनी फिर्यादी भावसार यांच्याकडून एकूण ९३ लाख ८५ हजार रुपये रोख स्वरूपात व बँक खात्यावर स्वीकारले. फिर्यादी भावसार यांची कर्ज प्रकरण मंजूर केले नाही तसेच फिर्यादीने दिलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक करून सुमारे ९४ लाखांचा अपहार केला. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते दि. १६ सप्टेंबर २०२४ दरम्यान नाशिक व मुंबई येथे घडला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.