वसई विरार परिसरात पुन्हा एकदा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

Spread the love

वसई विरार परिसरात पुन्हा एकदा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून भोयदापाडा येथील बेकायदेशीरपणे दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई

योगेश पांडे/वार्ताहर

वसई – वसई विरार शहरात पुन्हा एकदा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. नुकताच पालिकेच्या वैद्यकीय विभागाने वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथील बेकायदेशीरपणे दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई केली आहे. यावेळी डॉक्टर नसताना कर्मचाऱ्याकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे उघड झाले आहे. वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. विविध ठिकाणी वाढते अनधिकृत बांधकामे व बैठ्या चाळी अशा दाटीवाटीच्या भागात बोगस डॉक्टर दवाखाने थाटू लागले आहेत. नुकताच सातीवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय आरोग्य पथक तपासणीसाठी फिरत असताना वसई पूर्वेच्या भोयदापाडा राजावळी रस्त्यावर बालाजी क्लिनिक या नावाने कोणतीही परवानगी न घेता बोगस डॉक्टरद्वारे दवाखाना चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. शुक्रवारी दुपारी डॉ. श्रीनिवासराव धुधमल आणि पथक व पोलीस यांना सोबत घेऊन धाड टाकली. त्यावेळी डॉक्टर नसतानाही कामासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णाला इंजेक्शन देऊन उपचार केले जात असल्याचे उघड झाले आहे.

रामचंद्र रामदूर यादव असे या कर्मचाऱ्याचे नाव असून कोणतीही वैद्यकीय डिग्री नसल्याचे निष्पन्न झाले आहे. दवाखान्याला डॉ. आरविंद कुमार यादव यांचा फलक लावून त्या ठिकाणी कर्मचारी रुग्णांना सेवा देत होता अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. दवाखान्यात इन्जेक्शन्स, आय. व्हि. सेट व इतर अ‍ॅलोपॅथी औषधे आढळून आली असून याप्रकरणी रामचंद्र यादव याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची शोध मोहीम सुरूच आहे. दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते असे पालिकेने सांगितले आहे. याशिवाय आपल्या परिसरात असे अवैध (बोगस) वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे निदर्शनास आल्यास लगेचच जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती द्यावी असे आवाहनही नागरिकांना पालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon