बनावट जामीन देऊन न्यायालयाची फसवणूक करणार्या महिलेवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – शिवाजीनगर न्यायालयात महिलेच्या जामिनासाठी बनावट सात बाराचा उतारा सादर करुन फसवणूक करणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंदाकिनी भानुदास लाळे (रा. अभिरुची सिटी, आम्रपाली सोसायटी, वडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक १ मधील ज्युनिअर क्लार्क प्रशांत तायडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपी शोभा विजय शेडगे यांचा जामीन स्वीकारण्याकरीता मंदाकिनी लाळे (वय ६६) यांनी न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले होते. हे प्रतिज्ञापत्र सादर करताना सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच शिवणे गावातील ७/१२ उतार्याची प्रत सादर केली होती. ही ७/१२ उत्तार्याची प्रत न्यायालयाने अवलोकन केली असता त्यात काही हस्त लिखित नोंद पाहून त्यांची सत्यता तपासण्यास सांगितले. महसुल विभागच्या ऑनलाईन भूमी अभिलेख या सरकारी वेबसाईटवर पाहणी केली असता हा ७/१२ उत्तारा कालावली भागुजी शेडगे यांच्या नावावर असल्याचे दिसून आले. त्यामुळे जामीनदारांनी तिच्या प्रतिज्ञापत्रामध्ये खोटे विधान केले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे खोटी कागदपत्रे सादर करुन न्यायालयाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.