भिवंडीत घरफोड्या करणाऱ्या चोराच्या मुसक्या मानखुर्द येथून कोनगाव पोलिसांनी आवळल्या
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – ठाणे पोलीस परिमंडळ २ भिवंडी अंतर्गत येणाऱ्या कोनगाव गावात एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला मुंबईतील मानखुर्द परिसरातून अटक करण्यात कोनगाव पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी घरातून चोरीस गेलेले ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे १८ तोळे सोने आणि २ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील सकपाळ यांनी सांगितले की, २० ऑगस्ट रोजी कोनगाव येथील जय साई सोसायटी बिल्डिंगमधील एका फ्लॅटमधून ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे १८ तोळे सोने आणि २लाख रुपये रोख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे व त्यांच्या पथकाचे पोलीस अधिकारी अरविंद गोर्ले, मधुकर घोडसरे, नरेंद्र पाटील, राहुल वक्षे, रमाकांत साळुंखे, अच्युत गायकवाड, हेमंत खडसरे, हेमराज पाटील यांनी कोनगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सुमारे ८० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयित आरोपीची ओळख पटली. संशयित मानखुर्द परिसरात राहत असल्याचा सुगावा मिळाल्यानंतर पोलीस पथकाने आरोपी इम्तियाज अब्दुल हमीद शेख (३४) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून फ्लॅटमधून चोरलेल्या सर्व वस्तू हस्तगत केल्या आहेत. त्याच्यावर मुंबईतील चार पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक सुशील सकपाळ यांनी सांगितले.