यादव दाम्पत्याची वर्सोवा खाडीत उडी; पतीला वाचवण्यात यश, तर पत्नीचा शोध अद्याप सुरू

Spread the love

यादव दाम्पत्याची वर्सोवा खाडीत उडी; पतीला वाचवण्यात यश, तर पत्नीचा शोध अद्याप सुरू

योगेश पांडे / वार्ताहर 

मिरा रोड – मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील वर्सोवा खाडी पुलावरून एका दाम्पत्याने उडी मारल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पतीला वाचवण्यात यश आले आहे, तर पत्नीचा शोध अद्याप सुरू आहे. शशिकला दिनेश यादव (२८) आणि दिनेश यादव (३२) हे दाम्पत्य नायगावचे रहिवासी आहे. यादव दाम्पत्य गुरुवारी सकाळी अहमदाबादकडून मुंबईकडे येणाऱ्या वर्सोवा पुलावर पोहोचले. अचानक शशिकलाने वर्सोवा खाडीमध्ये उडी घेतली. त्यानंतर तिच्या पती दिनेश यादव ने तिला वाचवण्यासाठी तात्काळ पाण्यात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच मार्गावरील वाहनचालकांनी त्वरित स्थानिक पोलिसांना कळवले. मिरा-भायंदर अग्निशामक दल आणि काशिगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक विभागाने जलद बोटींच्या मदतीने दिनेश यादवला वाचवले. परंतु शशिकला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

काशिगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, शशिकलाच्या शोधासाठी शोधकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या मागे कौटुंबिक वाद असल्याचा संशय आहे, सध्या पोलिस घटनेची चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon