युट्यूबवर इस्राईल व पॅलेस्टाईन युद्धाचे व्हिडिओ पाहून युवक प्रभावित; शहीद होण्यासाठी पॅलेस्टाईनला निघालेल्या युवकाला मुंबईतून ताब्यात

Spread the love

युट्यूबवर इस्राईल व पॅलेस्टाईन युद्धाचे व्हिडिओ पाहून युवक प्रभावित; शहीद होण्यासाठी पॅलेस्टाईनला निघालेल्या युवकाला मुंबईतून ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

अहमदनगर – सोशल मीडियातून प्रभावित होऊन सध्याची पिढी काय करेन, याचा नेम नाही. अनेकजण सोशल मीडियातील व्हिडिओ पाहून प्रभावित होऊन विविध क्षेत्रात करिअर करताना पाहायला मिळतात. काहीजण आदर्श व्यक्तिमत्त्वाचे व्हिडिओ पाहून त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अहमदनगर शहरात बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या एका युवकाने चक्क पॅलेस्टाईनला जाऊन युद्धात शहीद होण्याचा निर्णय घेतला होता. युट्युबवर इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाचे व्हिडिओ पाहून हा युवक प्रभावित झाला होता, आणि त्यातूनच पॅलेस्टाईनला जायचे लक्ष्य डोक्यात ठेवत मुस्लिमांसाठी युद्धात शहीद व्हायचे आहे, असा विचार करुन त्याने थेट मुंबई गाठली. मात्र मित्रांच्या आणि कुटुंबीयांच्या मदतीने त्या तरुणाला अहमदनगरमध्ये आणण्यात पोलिसांनी यश आलं आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वी एका १४ वर्षीय मुलाने मोबाईलमधील गेम्सच्या आहारी जाऊन आपलं जीवन संपवलं. या गेमममधील टास्क सोडवताना चक्क १४ व्या मजल्यावरुन उडी मारली होती. आता, अहमदनगरमधील एका युवकानेही युट्यूबवरील व्हिडिओने प्रभावित होऊन थेट पॅलेस्टाईन गाठायचा निर्णय घेतला होता. अहमदनगर शहरात नगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव परिसरात, गांधीनगर येथे हा २० वर्षीय तरुण राहत होता. तो नेहमी मोबाईलवर इंस्टाग्राम आणि युट्युबच्या माध्यमातून इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाचे व्हिडिओ पाहत होता आणि मित्रांबरोबर मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराबाबत चर्चा करत होता.

मुस्लिमांसाठी काहीतरी करुन शहीद होण्याचा विचार डोक्यात घेऊन त्याने थेट पॅलेस्टाईनला जाण्याचा विचार करत त्याने मुंबई गाठली. हा मुलगा घरातून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, तो कुठेच सापडत नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगा हरवला असल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलीस आणि युवकाचे मित्र व कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान, या युवकाने आपल्या मित्राला फोन करून मी पॅलेस्टाईनला जात आहे, सध्या मुंबई येथे असून तुला माझ्याबरोबर यायचे असेल तर तूही मुंबईला ये असा निरोप पाठवला. या निरोपावरून शोध घेत कुटुंबीयांनी थेट मुंबई गाठत आपल्या मुलाला ताब्यात घेतले. त्याला पुन्हा अहमदनगरमध्ये आणल्याने त्यांना मुलगा सुखरुप परत मिळाला. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी आता या प्रकरणाबाबत गांभीर्याने चौकशी सुरू केली असून मुलाचे समुपदेशन सुरू आहे. तसेच पॅलेस्टाईनला निघालेला नगरमधील युवक कोणाच्या संपर्कात होता, याची माहितीही पोलिसांसह विविध गुप्तचर यंत्रणा घेत आहेत. यासाठी या युवकाचे फेसबुक, इन्स्टाग्राम खाते तपासले जात आहे, अशी माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंद कोकरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon