नाशिक हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट, मुख्य मद्य वितरकास सिल्वासातून केले जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – अवैध मद्य तस्करी प्रकरणी आरोपींच्या गाड्यांचा पाठलाग करताना आरोपींकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला दिलेल्या धडकेत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर तीन पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. तर या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून मुख्य मद्य वितरकास बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिकच्या ग्रामीण गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून मुख्य मद्य वितरकास सिल्वासा येथून ताब्यात घेतले. राहुल सहानी असे मद्य तस्कराचे नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यावर गुजरातमध्ये मद्य तस्करीचे सात गुन्हे दाखल आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर तपास करताना मद्यतस्करीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. अखेर पोलिसांना मुख्य तस्करास बेड्या ठोकण्यात यश आले. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शोध पथकातील पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आता मुख्य आरोपीकडून मद्य तस्करांच्या रॅकेटबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिल्वासावरून गुजरातकडे सात ते आठ महागड्या गाड्यांमधून अवैधरित्या मद्यतस्करी केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मिळाल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाशिकच्या द्वारका परिसरात सापळा रचून गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालक गाडी न थांबवता पुढे निघून गेले. याच गाड्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत असताना दोन ते तीन ठिकाणी गाडी अडविण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आला. चांदवड परिसरात संशयित आरोपीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला धडक देत पळ काढला होता. अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले होते. आता नाशिक पोलिसांनी मुख्य मद्य तस्करास अटक केली आहे.