अहमदनगर पालिका आयुक्त पंकज जावळे लाचप्रकरणी फरार, लाचलुचपतची कारवाई
योगेश पांडे / वार्ताहर
अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने मोठी कारवाई केली असून त्यांचं राहतं घर सील केलं आहे. लिपिक शेखर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तसह लिपिक फरार झाले आहेत. या प्रकरणात एसीबीने डॉ. पंकज जावळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी ८ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. याच प्रकरणात १९ आणि २० जून रोजी ही लाच मागितली होती.
अहमदनगर पालिका लिपिक शेखर देशपांडे याच्याकडून ही ८ लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत पथकाने कारवाई सुरू केली. लाचलुचपतच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचं राहतं घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारावईनंतर आयुक्त फरार झाले असून त्यांच्या कार्यालयाबाहेर लाचलुचपत विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून लाचलुचपतने ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसंबंधीची मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त पंकज जावळे यांनी लिपिक देशपांडे यांच्यामार्फत आठ लाखांची लाच मागितली होती. त्यानुसार गुरूवारी ही लाच स्वीकरण्यात येणार होती. महत्त्वाचं म्हणजे या दोघांनीही गुरुवारी शासकीय रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे. लिपिक शेखर देशपांडे याच्या बुऱ्हाण नगर येथील घरावर छापेमारी करण्यात आली आहे. तर आयुक्त फरार झाल्यानंतर त्यांचे शासकीय निवासस्थान सील करण्यात आलं आहे. ते जेव्हा समोर येतील त्यावेळी त्यांच्यासमोर या घराची झाडाझडती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.