शेअर बाजारात गुंतवणूक प्रकरण, ९१ लाखाला गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मंगळवेढा – शेअर बाजारात गुंतवणूक केली तर एका वर्षानंतर दरमहा कमविलेल्या रकमेवर १० टक्के नफा मिळेल असा विश्वास देत गुंतवणूक करायला लावून ९१ लाख रुपये गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मनोज चंद्रकांत पवार व रुपेश चंद्रकांत पवार (दोघे रा. संग्रामनगर, ता. माळशिरस) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे असून याप्रकरणी आकाश अधिकराव मुंजाळ (वय ३६, रा. यशवंतनगर, ता. माळशिरस) यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत अकलूज पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी आकाश मुंजाळ यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर एक वर्षानंतर दरमहा कमविलेल्या रकमेवर १० टक्के नफा मिळेल असे आश्वासन देत गुंतवणूक करावयास लावले.२८ ऑक्टोबर २०२१ ते १० मे २०२३ या कालावधीत रोख स्वरुपात व आरटीजीएस मार्फत वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यात ९१ लाख रक्कम पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा नफाही व मुद्दलही दिले नाही. त्यानंतर त्या दोघांविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे करीत आहेत.