नागपूर विमानतळ उडवण्याची धमकी; कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही,विमानतळावरील बंदोबस्त वाढवला

Spread the love

नागपूर विमानतळ उडवण्याची धमकी; कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही,विमानतळावरील बंदोबस्त वाढवला

योगेश पांडे / वार्ताहर 

नागपुर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेल सोमवारी पुन्हा एकदा प्राप्त झाला. आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. यावेळी सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासणीमध्ये कुठलीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. तरीदेखील प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत विमानतळावरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकीचे मेल गेल्या काही महिन्यांपासून विविध विमानतळांना प्राप्त होताहेत. असाच प्रकार सोमवारी सकाळी ७ ते ७.३० वाजतादरम्यान घडला. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ला सकाळी विमानतळावर बॉम्ब असल्याचा मेल प्राप्त झाला. त्यांनी तो मेल मिहान इंडिया लिमिटेडला फॉरवर्ड केला. अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यानंतर निर्धारित असलेल्या प्रक्रियेनुरूप विमानतळावर बॉम्ब डिटेक्शन एन्ड डिस्पोजल स्क्वाड आणि श्वान पथक तैनात करण्यात आले.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) चमूद्वारे दक्षता बाळगण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत सुरक्षा तपासणीत वाढ करण्यात आली आहे. पार्किंग परिसरात वाहनांची तपासणी केली जात आहे. विमानतळाच्या हद्दीबाहेरही गस्त घालण्यात येत आहे. विमानतळाच्या सुरक्षेत पोलिस कार्यरत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील काही दिवस विमानतळावर कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकीचा मेल यापूर्वी २९ एप्रिल आणि १८ जून रोजी प्राप्त झाला होता. तोच प्रकार सोमवारी पुन्हा एकदा घडला. सातत्याने घडत असलेल्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन अटक व्हायला हवी, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon