काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बदनामी करणाऱ्या प्रवीण गीतेवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
अहमदनगर – काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावे घेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणाऱ्या प्रवीण शरद गीते या परमिट रूम, बियर बार चालकाला चांगलेच महागात पडले आहे. काळे यांच्या फिर्यादीवरून सीआरपीसीच्या सेक्शन १५५ अन्वये एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत किरण काळे यांचा कोणताही संबंध नसताना गीते याने आमचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सह वरिष्ठ नेत्यांची नावे येत काळे यांचे नाव जोडण्याचा बनाव रचला आहे. यामागे राजकीय षडयंत्र आहे. या षडयंत्राचे सूत्रधार असणारे कार्यसम्राट लोक कोण आहेत हे नगरकरांना माहित आहे. शहरातील दहशत, गुंडगिरी विरुद्ध सातत्याने आवाज उठवणाऱ्या काळे यांनाच गुंड म्हणून खोटी माहिती प्रसारित करीत बदनाम करण्याचे कटकारस्थान विरोधकांनी रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने गुंदेचा यांनी केला आहे. गीते बनाव प्रकरणाचा पोलिसांनी मास्टरमाईंड शोधून काढण्याची काँग्रेसने मागणी केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मी किरण गुलाबराव काळे, समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून लेखी फिर्याद देतो की,मी अहमदनगर काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. दिनांक १९ जून २०१४ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास मी एमआयडीसी मध्ये असताना माझ्या मोबाईल मध्ये समाज माध्यमांवर प्रवीण शरद गीते, धंदा – परमिट रूम, बिअर बार चालक, रा. विखे पाटील फाउंडेशन समोर, नगर – मनमाड रोड या व्यक्तीचा समाज माध्यमांवर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला. गीते याने अत्यंत धादांत खोटे, बीनबुडाचे वक्तव्य करून माझी समाजात नाहक बदनामी केली आहे.
सदर व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, मी गीते संगमनेरला आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांची भेट घेतली. याचा राग मनात धरून किरण काळे यांनी माझ्या हॉटेलवर काही मुलं पाठवली. रात्री साडेअकरा वाजेचे सुमारास त्यांनी मला शिवीगाळ करून धक्काबुक्की, मारहाण केली. हॉटेलवर दगडफेक केली. हल्लेखोरांचे एकच म्हणणे होते की, आमच्या किरण भाऊंना नडायचे नाही. नाही तर आम्ही तुला संपवून टाकू. माझ्या हॉटेलमधून काही रक्कम चोरी झाली आहे, असे म्हणत अत्यंत धादांत खोटी, बीनबुडाची माहिती प्रसारित करून माझी समाजातील प्रतिष्ठा, नावलौकिक खराब करून नाहक बदनामी केली आहेत, म्हणून माझी इसम प्रवीण गीते याच्याविरुद्ध फिर्याद आहे. काळे यांच्या फिर्यादीवरून गीतेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे की, प्रत्यक्षात सिव्हील हॉस्पिटलला गीते या परमिट रूम चालकाने प्रसारमाध्यमांना मध्यरात्री बाईट देताना एक हकीगत सांगितली. त्यानंतर तो तिथून पसार झाला. मधल्या काळात तो कुठे होता, कोणाला भेटला, कोणाशी बोलला याची कोणालाच माहिती नाही. मात्र काल रात्री त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देताना दुसरीच हकीगत सांगितली आहे. यातून हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी तथाकथित आयटी पार्कचा इन कॅमेरा भांडाफोड केल्यानंतर किरण काळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्यक्षात पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर सदर प्रकरणातील फिर्यादी महिला ही घटनास्थळी उपस्थितच नसताना तिचा विनयभंग कसा होऊ शकतो? असे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सदर खोटी फिर्याद देणाऱ्या महिलेविरुद्ध मे. न्यायालयात अहवाल सादर केला आहे. तथाकथित चावला हाफ मर्डर केस मध्ये देखील काळे यांना विरोधकांनी गोवले होते. मात्र त्याही प्रकरणात बनाव असल्याचे समोर आले आहे. राजकीय दबावातून स्वयंघोषित कार्यसम्राट अशी षडयंत्र वारंवार काळे यांच्या विरोधात रचत आहेत. पोलिसांनी खोट्या फिर्यादी दाखल होणार नाही त्यासाठी आधीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.