मतमोजणीच्या अगोदर नायगांवमध्ये १६ राउंडसह दोन आरोपीना अटक; म्होरक्या फरार
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या अगोदरच वसईच्या नायगांव पोलिसांनी एका मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे. एका इनोव्हा कारमध्ये आलेल्या दोघां आरोपींना १६ राउंडसह अटक केली आहे. तर यात एक सराईत गुन्हेगार हत्यार घेऊन फरार झाला आहे. रविवारी दुपारी नायगांवच्या परेरा नगर येथे एका इनोवा कारमध्ये काहीजण हत्यारं घेवून आल्याची माहिती नायगांव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केल्यावर यातील सराईत आरोपी विकी भरत म्हात्रे फरार होण्यास यशस्वी झाला, तर त्याचे साथीदार कल्पेश रामदास वैती, नऊश नरेश नांदोरकर या दोघांना पकडण्यात यश मिळालं आहे. पोलिसांना गाडीतून १६ जिवंत काडतूस मिळालं आहे. विकी म्हात्रेवर याअगोदर ही तीन वेळा गोळीबार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रफुल्ल तांगडी याच्यावर २३ जानेवारी २०२१ रोजी चार राउंड फायर केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात ते सुदैवानं बचावले होते. तांगडी यांनी विकी म्हात्रे हा सराईत गुन्हेगार असून, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मोकळा कसा? असा सवाल उपस्थित केला आहे. तर हा पुन्हा मला मारण्यासाठी नायगाव येथे आल्याचा आरोप करत, आरोपी विकी हा भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, विकी हा आपल्या साथीदारांसोबत येथे कोणत्या मोठ्या कारवाईला अंजाम देण्यासाठी आला होता. याचा तपास आता नायगांव पोलीस करत आहे.