गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी बनले मोबाईल स्नैचर, गर्लफ्रेंडमुळेच अडकले पोलिसांच्या जाळ्यात 

Spread the love

गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी बनले मोबाईल स्नैचर, गर्लफ्रेंडमुळेच अडकले पोलिसांच्या जाळ्यात 

योगेश पांडे / वार्ताहर 

नागपुर – तरूण वयात मुला-मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक असतं. त्यातच गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असेल तर त्यांच्यासोबत वेळ घालवायची, त्यांना गिफ्ट्स देण्याची इच्छाही असते. पण गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी नागपूरच्या काही तरूणांनी हद्दच केली. पैसे मिळावेत म्हणून त्यांनी चक्क मोबाईल स्नॅचिंगचा धंदाच सुरू केला. तिघा मित्रांनी मिळून गँग बनवली आणि लोकांचे मोबाईल लुटू लागले. पण ज्या गर्लफ्रेंडसाठी ते हे सर्व करत होते, तिच्यामुळेच ते अडकले आणि पकडले गेले. आता ते पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून १५ मोबाईल हस्तगत करण्यात आले. आरोपी हे या क्षेत्रात नवीन असून गर्लफ्रेंडचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा पोलीस तपासात उघड झालं. पोलिसही त्यांचा हा कारनामा ऐकून हैराण झाले. नागपूरच्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून तीन मित्रांनी एकत्रित येत एक गँग बनवली आणि ही मोबाईल स्नॅचिंग करू लागली. हे तिघेही संध्याकाळच्या वेळेस दुचाकी वरून निघायचे आणि सुनसान परिसर गाठायचे. तिथे एखादी व्यक्ती जर मोबाईलवर बोलत असेल तर अलगद त्याच्या जवळून गाडी न्यायचे आणि त्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढायचे. असं करत करत त्यांनी मोबाईल चोरीचा एक प्रकारे व्यवसायच सुरू केला होता.

मात्र एका चुकीमुळे ते पोलिसांच्या हाती लागले. खरंतर त्यांनी चोरी केलेल्या मोबाईल्सपैकी एक मोबाईल हा तिघांपैकी एकाच्या गर्लफ्रेंडजवळ आढळला. पोलिसांनी तिच्याकडे सविस्तर चौकशी केल्यावर चोरीच्या गँगचं हे सगळं प्रकरण उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांही आरोपींना अटक करून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून यामध्ये आणखी एखादा आरोपी वाढण्याची शक्यात पोलिसांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon