भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार केला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

Spread the love

भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार केला म्हणून तरुणाला बेदम मारहाण

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – भिवंडी लोकसभा मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली होती. भिवंडीत तिहेरी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपप्रणित महायुतीकडून कपिल पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बाळ्या मामा रिंगणात होते. पण या दोघांनाही कडवं आव्हान होतं ते अपक्ष म्हणून लोकसभा लढवलेल्या निलेश सांबरेंचं. येत्या ४ जूनला भिवंडीचं मैदान कोण मारणार याचा फैसला होईल. अशातच निकाल अवघ्या काही दिवसांवर असतानाच भिवंडी शहर पुरतं हादरून गेलं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं काम केलं म्हणून एका युवकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळालं. भिवंडी लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचं काम केलं म्हणून युवकावर हल्ला झाल्याची घटना घडल्याचं जखमी तरुणानं सांगितलं आहे. भिवंडी शहरातील पद्मा नगर परिसरात आपल्या दुकानाचं कामकाज आटपून घरी जात असताना मागून आलेल्या बाईक स्वारानं त्याला मागून लाथ मारली. त्यानंतर शिवीगाळ करून त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तसेच, या तरुणाला सोडवण्यासाठी गेलेल्या त्याच्या दोन भावांनाही जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत श्रीनिवास नडीगोट्टूसह दोन भावांना लाकडी दांड्यानं दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं जबर मारहाण केली. या मारहाणीत तीन जण जखमी असल्याची माहिती आहे. ज्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणानं सांगितल्यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं काम केलं आणि त्या अनुषंगानं त्यांना महायुतीचे काही लोक कॉल करत होते, ते त्यांना धमकी देतील म्हणून त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यामुळे श्रीनिवास नडीगोट्टू यांनी त्यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय वैमनस्यातून झाल्याचं सांगितलं. फक्त महाविकास आघाडीचं काम केलं, या रागापोटी हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. श्रीनिवास नडीगोट्टूसहित त्यांच्या दोघा भावांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सखोल चौकशी करून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जखमी तरुणानं केली आहे. या संदर्भात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon