पोलीस निरीक्षकाच्या घरी सोन्याची बिस्किटे, कोट्यवधींचं घबाड आणि कागदपत्र; बीडमध्ये खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेतील १०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या यादीत नाव समाविष्ट करण्याची भीती दाखवून व्यावसायिकांकडून लाच उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकाने लाखो रुपयांची आर्थिक माया जमा केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घडावर धाड टाकली. त्यावेळी खाडे यांच्या घरात सोन्याची बिस्कीट, चांदीच्या विटा, सोन्याचे महागडे दागिने आणि नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली. ही सगळी संपत्ती पाहून एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारण्याची पाळी आली होती.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हरिभाऊ खाडे यांच्या घराची झाडाझडती सुरु केली तेव्हा एक-एक करुन मुद्देमाल सापडत गेला. यावेळी एका बॅगेत ५०० च्या नोटांची बंडलं आढळून आली. हे सर्व पैसे मोजण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांना मशीनचा वापर करावा लागला. यावेळी खाडे यांच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गेल्यावर्षी १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणात बँकेचे प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. हा तपास सुरु असताना आरोपी बबन शिंदे यांनी दोन बांधकाम व्यावसायिकांना ६० लाख रुपये दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा या दोन व्यावसायिकांकडे वळवला होता.
हरिभाऊ खाडे यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. त्यांनी दोन्ही व्यावसायिकांना याप्रकरणात आरोपी करण्याची धमकी दिली. आरोपींच्या यादीत नाव येऊन द्यायचे नसेल तर दोघांनीही प्रत्येकी ५० लाख रुपये द्यावेत, असे खाडे यांनी सांगितले होते. चार महिने खाडे पैशांसाठी या दोघांच्या मागे लागले होते. अखेर या दोघांनी घासाघीस करुन प्रत्येकी ३० लाख रुपये देण्याचे कबूल केले. यानंतर एका व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी व्यावसायिकाने पोलीस निरीक्षक खाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी खाडे पुण्यात होते. त्यांनी कुशल जैन या व्यापाऱ्याकडे ५ लाख रुपये दे, असे संबंधित व्यावसायिकाला सांगितले. त्यानुसार व्यावसायिकाने कुशल जैन याला पैसे दिले आणि एसीबीने त्याला अटक केली. एसीबीच्या या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रवीभुषण जाधवर हे दोघेही फरार झाले आहेत.