नालासोपाऱ्यात लग्नाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोनदा गर्भवती तर पहिल्या बाळाची विक्री

Spread the love

नालासोपाऱ्यात लग्नाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोनदा गर्भवती तर पहिल्या बाळाची विक्री

आचोले पोलीस ठाण्यात आई – वडील व नगरसेविकेसह १६ जणांवर गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

नालासोपारा – अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या बहाण्याने दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी दोन वेळा गरोदर राहिली. पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर बाळाला विकण्यात आल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील, डॉक्टर, माजी नगरसेविका यांच्यासह १६ जणांवर आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. प्रेम संबंधादरम्यान तरुणाने अनेकवेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ही मुलगी गर्भवती राहिली. ही बाब या तरुणाच्या लक्षात आल्यानंतर तरुण फरार झाला. घटनेनंतर पीडित मुलीचे कुटुंबीय मदतीसाठी माजी नगरसेविकेकडे गेल्यानंतर या माजी नगरसेविकेने आरोपी तरुणाच्या कुटुंबीयांकडून प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपये घेतले.

हे चार लाख रुपये माजी नगरसेविका पीडित मुलीचे आई-वडील आणि मध्यस्थ यांनी वाटून घेतले. त्यानंतर नालासोपारा येथील आर. के. हॉस्पिटल येथे अल्पवयीन मुलीची प्रसूती केली. अल्पवयीन मुलीची प्रसुती करण्यात आल्याची कोणत्याही प्रकारची माहिती यावेळी पोलिसांना देण्यात आली नाही. प्रसूतीनंतर अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. यावेळी पीडित मुलीचे आई- वडील आणि माजी नगरसेविकेने संगनमत करून या बाळाला विकले, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकारानंतर आपले निवास्थान बदलले. या ठिकाणी पुन्हा एकदा लग्न करण्याच्या बहाण्याने या पीडित मुलीवर तरुणाने लैंगिक अत्याचार केले. अमरावती येथे रुग्णालयात पीडित मुलीने तेथे एका बाळाला जन्म दिला, मात्र या तरुणाने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला. त्याने पीडित मुलीला आणि बाळाला एकटेच सोडले. या सर्व घटनाक्रमानंतर आपली घोर फसवणूक झाल्याचे पीडित अल्पवयीन मुलीच्या लक्षात आल्यानंतर पीडित मुलगी नालासोपारा येथे परतली.

एका सामाजिक कार्यकर्त्याला आपल्या सोबत घडलेल्या सर्व प्रकारची माहिती पीडित मुलीने दिली. त्यानंतर पीडित मुलीने, सामाजिक कार्यकर्त्यांसह आचोळे पोलीस ठाणे गाठत तिच्यासोबत घडलेल्या सर्व घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी भा.द.वि.स. कलम ३७६, ३७६ (२) (एन) ३१७, ३६३, ३७१ आणि पॉक्सो अशा विविध कलमान्वये लैंगिक अत्याचार करणारे दोन तरुण, पीडित मुलीचे आई- वडील, डॉक्टर, माजी नगरसेविकेसह एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon