पुण्यातील नामांकित पब वर पोलिसांची धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुणे पोलिसांनी घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या एलोरो आणि युनिकॉन या नामांकित पबवर पोलिसांनी कारवाई केली. या दोन्ही पबमधील साऊंड सिस्टिम आणि इतर असे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले. याशिवाय हॉटेलच्या मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन शेख, संदीप सहस्रबुद्धे, रश्मी कुमार, सुमित चौधरी आणि प्रफुल गोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील सगळ्या हॉटेल आणि पब, बार यांना आस्थापना सुरू ठेवण्यासाठी रात्री १.३० पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत एलरो आणि युनिकॉर्न हाऊस हे दोन्ही पब रात्री १.३० नंतर देखील सुद्धा सर्रास सुरू होते. भल्या मोठ्या डीजे साऊंड सिस्टिमने नागरिक हैराण होत असल्याच्या तक्रारी सुद्धा पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पब सुरू असल्याचं निदर्शनास आलं होतं. या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री उशिरा कारवाई केली आहे. पुणे पोलीस गुन्हेगारी कमी करण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवित आहेत.
पोलीस शिपाई संदीप खंडू कोळगे यांच्या फिर्यादीवरून संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे (रा. शिवाजीनगर), प्रफुल्ल बाळासाहेब गोरे (वय ३०, रा. सह्याद्री हॉस्पिटल जवळ, येरवडा), रश्मी संदेश कुमार (रा. औंध), सुमित चौधरी (लोहगाव) यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेरेब्रह्म आयटी पार्क कल्याणी नगर या बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावरच हॉटेल युनिकॉन हाऊस नावाचा आणखी एक पब या सर्वांनी चालवलेला होता. या ठिकाणी रात्री दीड ते पहाटे पावणे सहा पर्यंत बेकायदेशीरपणाने पब सुरू ठेवण्यात आला. या ठिकाणी देखील साऊंड सिस्टिम वाजवून नेमून दिलेल्या वेळेचे आणि नियमांचे उल्लंघन करण्यात आले. पोलिसांनी या ठिकाणावरून सात लाख ५० हजार रुपयांची साऊंड सिस्टिम, ४१ हजार १४९ रुपयांचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट, इतर मुद्देमाल असा एकूण सात लाख ९१ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे करीत आहेत. ही करवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे, वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.