पुण्यात मित्राच्या मदतीने मुलीनेच केली आईची हत्या; मुलगी आणि तिच्या मित्र दोघांवर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे शहरातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या मित्राच्या मदतीने स्वतःच्या आईचा खून केला आहे. मित्राच्या मदतीने आईच्या डोक्यात हातोडा घालत हत्या केलीये. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटने बाबत अधिक माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरी भागात ही घटना घडली. यामध्ये मंगल गोखले असे मृत आईचे नाव आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी याप्रकरणी योगिता गोखले आणि तिचा मित्र यश शितोळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
योगिताने मित्र यशच्या मदतीने आईच्या बँक खात्यातून पैसे काढले होते. आईला न सांगता आपण पैसे काढले आहेत. त्यामुळे तिला समजेल तेव्हा ती खूप रागवेल अशी भीती योगिताच्या मनात होती. यातून तिने आईची हत्या करण्याचा निर्णय घेतला. तिने प्लान आखला आणि आपल्या मित्राला घरी बोलावलं. घरातील हातोडा त्याला दिला. त्यानंतर या मित्राने आई झोपलेली असताना तिच्या डोक्यात हातोडा घातला. जोरात मार लागल्याने यातच आईचा मृत्यू झाला.
कुणाला संशय येऊनये म्हणून आई पाय घसरून पडली असा बनाव केला. मात्र नातेवाईकांना वेगळाच संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी मुलीची कसून चौकशी केली. त्यावेळी ही माहिती समोर आली. आता चंदन नगर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.