एलटीटी परिसरात ३.८८ कोटींचा ‘चरस’ जप्त; वरळी अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई

एलटीटी परिसरात ३.८८ कोटींचा ‘चरस’ जप्त; वरळी अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) परिसरातून तब्बल ३ कोटी ८८ लाख ६० हजार रुपये किमतीचा ‘चरस’ जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटचे पथक मुंबई शहरात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, साठा आणि पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेत गस्त घालत होते. त्यावेळी लोकमान्य टिळक टर्मिनस फ्लायओव्हरखालील रेल व्ह्यू सीएचएस रोड परिसरात एका इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून ३ किलो ८८६ ग्रॅम वजनाचा ‘चरस’ हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या चरसची अंदाजित किंमत ३ कोटी ८८ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरातील टिळकनगर पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीकडून अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई देवेन भारती, अनिल कुंभारे, कृष्णकांत उपाध्याय, नवनाथ ढवळे आणि सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास किरण वाघ हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon