कल्याणमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

कल्याणमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

जोशीबाग परिसरात तरुणीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; स्थानिक नागरिकांनी आरोपीचा शोध लावत पोलिसांच्या केले हवाली

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याणमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील जोशीबाग परिसरात एका तरुणीसोबत भररस्त्यात गैरवर्तन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक २२ वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या कामावर जाण्यासाठी निघाली होती. ती जोशीबाग परिसरातून जात असताना अचानक एक तरुण तिच्यासमोर आला. त्याच्या संशयास्पद हालचाली आणि वागण्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली. याच दरम्यान त्या तरुणाने तरुणीसोबत भररस्त्यात गैरवर्तन केले. हा प्रकार घडताच आरोपीने तिथून पळ काढला.

हा धक्कादायक प्रकार परिसरातील काही नागरिकांच्या नजरेस पडला. भररस्त्यात तरुणीसोबत असे कृत्य होत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्यांनी तातडीने आरोपीच्या दिशेने धाव घेत त्याचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला तो गर्दीचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, नागरिकांनी हार न मानता स्थानिक लोकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू ठेवला. अखेर नागरिकांनी त्याला शोधून काढले आणि थेट पोलिसांच्या हवाली केले. प्रथमेश जाधव असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या घटनेनंतर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलिसांनी आरोपी प्रथमेश जाधव याच्याविरोधात रीतसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भररस्त्यात एका मुलीसोबत असा प्रकार घडल्यामुळे स्थानिक महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon