वरळी कोळीवाड्यात अवैध जुगार-सट्टेबाजीचा अड्डा राजरोस; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

वरळी कोळीवाड्यात अवैध जुगार-सट्टेबाजीचा अड्डा राजरोस; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : वरळी कोळीवाडा परिसरात अवैधरित्या जुगार, सट्टेबाजी आणि कटिंगचे व्यवहार खुलेआम सुरू असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. गोल्फादेवी मंदिराजवळ, अचानक क्रीडा मंडळ परिसरात तसेच स्मशानभूमीच्या बाजूला संध्याकाळी साडेआठनंतर रात्री उशिरापर्यंत हा अवैध धंदा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सचिन’ नावाचा व्यक्ती या कथित अवैध व्यवहारांचे संचालन करत असल्याची चर्चा परिसरात आहे. नागरिकांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडे अनेकदा तक्रारी केल्याचा दावा केला जात असला, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने दादर पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी संशयास्पद व्यक्तींची सतत वर्दळ असते. काही युवक जुगाराच्या व्यसनामुळे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. सट्टेबाजी आणि जुगाराचे व्यवहार विविध माध्यमांतून सुरू असून, त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“हा प्रकार इतक्या उघडपणे सुरू असताना पोलिसांना याची माहिती नाही का? की कोणाच्या दबावामुळे कारवाई टाळली जात आहे?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आवारे आणि दादर पोलीस प्रशासन या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, १८८७ नुसार सार्वजनिक जुगारगृह चालवणे, सट्टेबाजी करणे किंवा जुगाराला प्रोत्साहन देणे हा दंडनीय गुन्हा आहे. संबंधित कायद्यानुसार पोलिसांना संशयित ठिकाणी वॉरंटशिवाय छापे टाकण्याचे तसेच जुगाराशी संबंधित साहित्य जप्त करण्याचे अधिकार आहेत. तरीही वरळी कोळीवाड्यात कथितपणे सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon