पार्टीत ओळख, घरी सोडण्याचा बहाणा अन् चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; कोरेगाव पार्कमध्ये गुन्हा

पार्टीत ओळख, घरी सोडण्याचा बहाणा अन् चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; कोरेगाव पार्कमध्ये गुन्हा

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका महिलेवर चालत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री एका हॉटेलमध्ये आयोजित पार्टीदरम्यान ओळख झालेल्या व्यक्तीने “घरी सोडतो” असे सांगून महिलेला कारमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि आरोपी यांची ओळख कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पार्टीमध्ये झाली होती. पार्टी संपल्यानंतर आरोपीने महिलेला घरी सोडण्याचा बहाणा करून आपल्या कारमध्ये बसवले. त्यानंतर मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावरून जात असताना चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर पीडित महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.

या घटनेमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आता कोरेगाव पार्क परिसरातील या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon