‘पोक्सो’ प्रकरणात अडकवण्याची धमकी; खंडणीच्या तणावातून रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या?

‘पोक्सो’ प्रकरणात अडकवण्याची धमकी; खंडणीच्या तणावातून रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या?

योगेश पांडे / वार्ताहर

विरार : खोट्या ‘पोक्सो’ गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या तणावातून रेल्वे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

लालजी रामसजीवन सरोज (वय ३२) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते भारतीय रेल्वेमध्ये ‘फिटर’ म्हणून कार्यरत होते. ते विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरातील जगन्नाथ अपार्टमेंटमध्ये राहत होते. पत्नी आणि मुले गावी गेल्याने ते घरी एकटे होते.

१३ मे रोजी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी नातेवाईकांना दिली. त्यानंतर विरार पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता लालजी सरोज हे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत आढळले. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने जखम झालेली होती. घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकूही आढळून आला. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या मृत्यूमागील कारणांबाबत सुरुवातीला संभ्रम होता. मात्र, मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. तक्रारीनुसार, राकेश तिवारी आणि असलम शेख हे दोघे गेल्या काही दिवसांपासून लालजी यांना मानसिक त्रास देत होते. “तुला ‘पोक्सो’च्या खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी देत त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच मारहाण करून जबरदस्तीने दारू पाजल्याचाही दावा कुटुंबीयांनी केला आहे.

मृत्यूपूर्वी लालजी यांनी भीतीच्या अवस्थेत आपल्या भावाला फोन करून आरोपींकडून सतत धमक्या दिल्या जात असल्याचे सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी राकेश तिवारी हा स्वतःला पत्रकार असल्याचे सांगून धमकावत होता. या प्रकरणी विरार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon