प्रेमत्रिकोणातून तरुणाचे अपहरण; रात्रभर फिरवत बेदम मारहाण, दोघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा-भाईंदर : एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाचे अपहरण करून त्याला रात्रभर शहरात फिरवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मिरा-भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तीन जण फरार आहेत.
पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ मे रोजी भाईंदर पूर्वेतील पूजानगर परिसरात घडली. श्रेयस मिश्रा हा तरुण रात्री घरी असताना आरोपी आशिष राज याने त्याला घराखाली बोलावले. त्यानंतर आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्याचा आरोप आहे.
आरोपींनी श्रेयसला रात्रभर मिरा-भाईंदर परिसरात विविध ठिकाणी फिरवत मारहाण केली. तसेच त्याच्या अंगावर सिगारेटचे चटके दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास आरोपींनी त्याला घरी सोडले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी नवघर पोलिसांनी अपहरण, दरोडा आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तीन आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात प्रेमत्रिकोणातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.