प्लास्टिकमुक्त समाजासाठी भारत विकास परिषदेचा ‘स्टील बँक’ उपक्रम

प्लास्टिकमुक्त समाजासाठी भारत विकास परिषदेचा ‘स्टील बँक’ उपक्रम

पुणे : वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा “स्टील बँक प्रकल्प” हा अभिनव उपक्रम भारत विकास परिषद, स्वारगेट शाखेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. सामाजिक कार्यक्रमांमध्ये डिस्पोजेबल वस्तूंऐवजी स्टीलच्या भांड्यांचा वापर वाढवून “प्लास्टिकमुक्त कार्यक्रम” ही संकल्पना रुजवण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

सध्या घरगुती तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये कागदी पत्रावळी, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, द्रोण आदी वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. कार्यक्रमानंतर निर्माण होणारा कचरा पर्यावरणासाठी गंभीर समस्या ठरत असून, प्लास्टिकमुळे नदी-नाले तुंबणे, ड्रेनेज व्यवस्था विस्कळीत होणे आणि निसर्गाची हानी होणे अशा समस्या वाढत आहेत.

या समस्येवर पर्यावरणपूरक पर्याय म्हणून भारत विकास परिषद, स्वारगेट शाखेने “स्टील बँक प्रकल्प” सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत विविध कार्यक्रमांसाठी स्टीलची ताटे, वाट्या, ग्लास, चमचे आणि नाश्ता प्लेट यांसारखे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. कार्यक्रमानंतर हे साहित्य परत जमा करण्यात येणार असल्याने प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमातून सामाजिक संदेशही देण्यात आला. डिस्पोजेबल वस्तूंवर होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच रकमेत भांडी स्वच्छ करणाऱ्या महिलांना रोजगार व आर्थिक मदत उपलब्ध करून देता येऊ शकते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

उद्घाटन प्रसंगी स्वारगेट शाखेच्या अध्यक्षा सौ. सुविधा नाईक, सचिव प्रतिमा खांडेकर, कोषाध्यक्ष शैलेश शाह, प्रांत महिला संघटक सुषमा कोंडे, रिजन पर्यावरण सचिव अतुलजी सलागरे, ज्येष्ठ कार्यकर्ते मदनलालजी दरडा तसेच वैशालीताई पाटील, जान्हवी सलागरे, कांता गाणोजे, समीक्षा सलागरे यांच्यासह शाखेचे अनेक सभासद उपस्थित होते.

“स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त समाज” घडविण्याच्या दिशेने भारत विकास परिषद, स्वारगेट शाखेचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon