३५५ सीसीटीव्हींच्या तपासातून घरफोडी उघड; पुण्यातून आरोपी जेरबंद, ६५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : फिर्यादी यांच्या घरातून सोन्याचे व डायमंडचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नागपूर शहर पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याची उकल करत आरोपींना पुण्यातून अटक केली. या कारवाईत एकूण ६५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास सुरू करताना पोलिसांनी सुमारे ३५५ स्थानिक तसेच शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पुणे येथील एका लॉजमध्ये सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता सोन्याचे दागिने, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६५.८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते मार्च २०२६चा ‘मासिक सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.