सहकारी पोलिसांच्याच पगारावर डल्ला; लातूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर ₹२.३८ कोटी अपहाराचा गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
लातूर : पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन प्रक्रियेत बनावट कागदपत्रांच्या आधारे फेरफार करून शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारातील रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह चार जणांविरोधात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, तब्बल ₹२ कोटी ३८ लाख ९२ हजारांचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
लातूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत मिळणारे इन्सेंटिव्ह, विशेष भत्ता आणि इतर आर्थिक लाभांच्या नोंदींमध्ये खाडाखोड करून हा प्रकार २०१५ ते २०२५ या कालावधीत करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात राहुल वाघदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय शिरसागर आणि पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीनुसार, आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून सुमारे ३६८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अतिरिक्त रक्कम परस्पर काढून घेतली. संबंधित रक्कम थेट आरोपींच्या बँक खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचेही समोर आले आहे.
तपासात राहुल वाघदरे यांनी सुमारे ₹९० लाख ५७ हजार, ब्रिजकिशोर ठाकूर यांनी ₹१ कोटी २३ लाख ३६ हजार, तर दत्तात्रय शिरसागर यांनी ₹४८ लाख ९८ हजार इतकी रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण गैरव्यवहाराची चौकशी लातूरचे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधितांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. पोलीस दलातीलच कर्मचाऱ्यांच्या पगारावर डल्ला मारल्याने विभागात मोठी खळबळ उडाली आहे.