ठाण्यात खंडणी विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह सराईत आरोपी जेरबंद

ठाणे : अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. मोगेश सुनील म्हात्रे (वय ३२, रा. काल्हेर, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून ३० हजार २०० रुपये किमतीचे गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
खंडणी विरोधी पथकातील सपोनि कापडणीस, पोहवा शैलेश शिंदे, पोशि संतोष वायकर, पोशि अरविंद शेजवळ आणि पोना सुमित मधाळे हे पथक ८ मे रोजी कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीत फरारी आणि रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोहवा शैलेश शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम अवैध शस्त्रासह काल्हेर-ठाणे सार्वजनिक रस्त्यावर येणार आहे.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी न्यू कशेळी ब्रिज परिसरात सापळा रचला. संशयित मोगेश म्हात्रे याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे शस्त्र परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही आरोपीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३, २५(१ब)(अ) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला ८ मे रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वी नारपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हाही दाखल आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.