कल्याणात अंमलीविरोधी पथकाची कारवाई; २१ लाखांचा गांजा जप्त, तिघे जेरबंद

कल्याणात अंमलीविरोधी पथकाची कारवाई; २१ लाखांचा गांजा जप्त, तिघे जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क 

कल्याण : अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत कल्याण परिमंडळ ३ च्या पथकाने मोठी कारवाई करत १०७ किलोहून अधिक गांजा जप्त केला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २१.९१ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३, कल्याण यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना ४ मे रोजी दुपारी वाडेघर परिसरातील डम्पिंग ग्राउंडजवळ संशयास्पद हालचाली करणारे तिघे आढळले. त्यांच्या जवळ हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या गोण्या असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी जवळ जाताच तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १०७ किलो ५० ग्रॅम गांजा, १०,५०० रुपयांची रोख रक्कम, तीन मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा एकूण २१,९१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक आरोपींमध्ये वसिम नुरूजमा खान उर्फ पिला (रा. भिवंडी), दिनेशकुमार सजीवर सरोज (रा. ठाणे) आणि मोहित मेवालाल वर्मा (रा. मुलुंड) यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपींविरुद्ध यापूर्वीही अंमली पदार्थ प्रकरणातील गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने त्यांना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon