बनावट कर्करोग प्रमाणपत्राने रेल्वे सवलत लाटण्याचा प्रयत्न; खारघरमध्ये गुन्हा

बनावट कर्करोग प्रमाणपत्राने रेल्वे सवलत लाटण्याचा प्रयत्न; खारघरमध्ये गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क 

पनवेल : कर्करोगी असल्याचे खोटे भासवून रेल्वे तिकीट सवलत मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवाशांकडून पैसे उकळत रेल्वे प्रशासन आणि शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

पनवेल रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटर क्रमांक २ येथे २३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६.१० वाजता हा प्रकार उघड झाला. आरोपींनी कर्करोगी रुग्णांसाठी मिळणाऱ्या सवलतीचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार केले होते. हे प्रमाणपत्र टाटा मेमोरियल सेंटरच्या अधिकृत कागदपत्रांसारखे भासवण्यात आले होते. त्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बनावट सह्या आणि रुग्णालयाचे खोटे शिक्केही मारण्यात आले होते. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे संशय निर्माण होऊन हा प्रकार समोर आला.

तपासादरम्यान, ३० एप्रिल २०२६ रोजी ‘गोल्डन टेम्पल मेल’ (गाडी क्रमांक १२९०३) या गाडीत बांद्रा टर्मिनस ते अंबाला कॅन्ट या मार्गावर दोन प्रवाशांना कर्करोगी रुग्ण म्हणून दाखवत सवलतीची तिकिटे काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत संबंधित प्रवासी कर्करोगी नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या कडे बनावट प्रमाणपत्र आढळले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे हे पुढील तपास करीत असून संबंधित टोळीचा शोध सुरू आहे. ही टोळी प्रवाशांपर्यंत कशी पोहोचते, तसेच अशा प्रकारे किती काळ आणि किती वेळा बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाला, याचा तपास केला जात आहे.

कर्करोगी रुग्णांच्या नावाने सवलतींचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा हा पहिलाच प्रकार खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon