भाजप खासदाराच्या गाडीला डंपरची धडक,भीषण अपघात ; चालक जखमी मात्र खासदार बचावले
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – राज्यभर महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी जाताना भारतीय जनता पक्षाचे खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात खासदार सावरा यांना गंभीर दुखापत झाली नाही मात्र त्यांच्या चालकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या गाडीचा शुक्रवारी सकाळी घोडबंदर रोडवर अपघात झाला. पालघर येथे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाण्याहून पालघर कडे जात असताना हा झाला अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी असल्याने ट्रॅफिक पोलिसांच्या सूचनेनुसार त्यांची गाडी रॉन्ग साइडने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली.
या अपघातात खासदार सावरा हे सुखरूप बचावले आहेत, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर त्यांच्या चालकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यात खासदरांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, समोरून येणारा ट्रक चालक मोबाईलवर बोलत असल्याने त्याचे गाडीवरील लक्ष नसल्याने तो येऊन धडकला आहे. सध्या नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.