डोंबिवलीत नैराश्यातून टोकाचा निर्णय; वीज वितरण बॉक्समध्ये हात घालून तरुणाची आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली : घरगुती वाद आणि पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्यातून एका ३६ वर्षीय तरुणाने महावितरणच्या वीज वितरण बॉक्समध्ये हात घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम येथे उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
समाधान कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून, तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेल्याने तो खचून गेला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथील नवसंपदा इमारतीसमोर रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या वीज वितरण बॉक्समध्ये (डीपी बॉक्स) कांबळे यांनी हात घातला. त्यांना तीव्र विद्युत धक्का बसल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच विष्णू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून कौटुंबिक वादातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.