निफाडमध्ये भोंदूबाबाचा घृणास्पद प्रकार; ‘बाधा काढतो’ म्हणत महिलेचे लैंगिक शोषण

निफाडमध्ये भोंदूबाबाचा घृणास्पद प्रकार; ‘बाधा काढतो’ म्हणत महिलेचे लैंगिक शोषण

पोलीस महानगर नेटवर्क 

नाशिक : निफाड तालुक्यातील धरणगाव येथील स्वयंघोषित भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश काकडे याने ‘बाहेरची बाधा काढतो’ आणि कौटुंबिक समस्या दूर करतो, असे आमिष दाखवत एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर कारवाईला गती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१४ मध्ये संबंधित पीडित महिला कौटुंबिक अडचणी आणि मानसिक त्रासातून मार्ग काढण्यासाठी धरणगाव येथील महेशगिरीच्या मठात गेली होती. त्यावेळी महेशगिरीने तिला ‘बाहेरची बाधा’ असल्याचे सांगून आपल्या जाळ्यात ओढले.

यानंतर ‘उपाय’ करण्याच्या नावाखाली त्याने महिलेला विश्वासात घेतले. लग्नाचे आमिष दाखवत तसेच जिवाला धोका असल्याची भीती निर्माण करून त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पीडितेने याबाबत तक्रार देण्यासाठी प्रयत्न केले असता सुरुवातीला पोलिसांकडून टाळाटाळ झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने तिने न्यायासाठी लढा सुरू ठेवला. अखेर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आरोपी महेशगिरी उर्फ महेश काकडे याच्याकडून अशाच प्रकारे अनेक महिलांचे शोषण झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon