ठाणे आरोग्य व्यवस्थेची लक्तरे! 

ठाणे आरोग्य व्यवस्थेची लक्तरे! 

रुग्णवाहिकेअभावी प्रसूतीनंतर मातेचे हाल; आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – महिलेच्या प्रसूतीनंतर तिला रुग्णवाहीका न मिळाल्यामुळे तिला मोठ्या संकटाचा सामना कराला लागला. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) संवेदनशून्य कारभार त्यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सिझेरियन झालेल्या एका आदिवासी मातेला डिस्चार्जनंतर रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याने, तिला आपल्या नवजात बाळासह रणरणत्या उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. ठाणे सारख्या विकसित शहरात घडलेल्या या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वरसाळे येथील रहिवासी रोशनिता कामडी (२३) या महिलेची १८ एप्रिल रोजी ठाणे सिव्हिल रुग्णालयात प्रसूती झाली होती. २२ एप्रिल रोजी डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला. मात्र, घरी जाण्यासाठी रुग्णवाहिकेची (102 आणि 108) मागणी केली. मात्र आम्हाला “जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही” असे सांगून रुग्णालय प्रशासनाने मदत नाकारली, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. परिणामी, टाके पडलेल्या अवस्थेत या मातेला नवजात बालकासह कडक उन्हात रुग्णालय परिसरात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर डॉ. गोऱ्हे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाच्या या अमानवीय वागणुकीची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “बाळंत माता आणि नवजात बाळाच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गरीब रुग्णांचा आधार समजल्या जाणाऱ्या ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्येच माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

प्रसूतीनंतर घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने एका आदिवासी महिलेला आपल्या तान्ह्या बाळासह उन्हात वनवन फिरावे लागले. रुग्णालय प्रशासनाच्या “जिल्ह्याबाहेर जाणार नाही” या आडमुठ्या धोरणामुळे एका कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागला आहे. प्रसूतीनंतर चार दिवसांनी तिला घरी जाण्यास सांगण्यात आले. नियमानुसार बाळंत मातांना घरपोच सोडण्याची जबाबदारी रुग्णवाहिकेची असते. मात्र, रुग्णालय कर्मचाऱ्यांनी मदतीस नकार दिला. भर उन्हात पत्नी आणि बाळाचे हाल होताना पाहून पती महेश कामडी हतबल झाले होते. अखेर श्रमजीवी संघटनेच्या मदतीने हा विषय वरिष्ठ स्तरावर पोहोचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon