राज्यात ५३ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे उभारणीला गती; फिटनेस चाचणी एटीएसमार्फत अनिवार्य

राज्यात ५३ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे उभारणीला गती; फिटनेस चाचणी एटीएसमार्फत अनिवार्य

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : राज्यातील वाहनांची फिटनेस तपासणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांमार्फत (ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन – एटीएस) करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात प्रस्तावित ५३ केंद्रांची उभारणी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी या कामाचा आढावा घेतला.

केंद्रीय मोटार वाहन नियम ६२ अंतर्गत २३ सप्टेंबर २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील सर्व वाहनांची फिटनेस चाचणी १ एप्रिल २०२५ पासून केवळ नोंदणीकृत एटीएस केंद्रांमार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पारंपरिक मानवी तपासणी पद्धती टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे.

राज्यात आतापर्यंत सात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे पूर्ण झाली असून उर्वरित ३७ केंद्रे ऑगस्टअखेर कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रलंबित केंद्रांसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

दरम्यान, स्वयंचलित तपासणी केंद्रे पूर्णत्वास न आल्यामुळे केंद्र सरकारकडून काही परिवहन कार्यालयांच्या ‘परिवहन/वाहन’ पोर्टलवरील प्रवेशावर टप्प्याटप्प्याने निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे वाहनधारक व वाहतूकदारांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देत हे निर्बंध उठविले.

या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, उपसचिव चेतन निकम तसेच एआरएआयचे उपसंचालक मकरंद पाठक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon