भररस्त्यात महापौर संतापल्या; धोकादायक चेंबरवरून अधिकाऱ्याला अल्टिमेटम
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण : कल्याण शहरातील नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नावर केडीएमसीच्या महापौर हर्षाली थविल यांनी गुरुवारी थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाला धारेवर धरले. प्रेम ऑटो परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणीपुरवठा विभागाच्या अंडरग्राउंड चेंबरचे लोखंडी झाकण तुटून उघडे पडल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
या उघड्या चेंबरमुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थितीची पाहणी करताच महापौरांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी महेश डावरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत तीव्र नाराजी व्यक्त केली.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे हे निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. आजच हे झाकण दुरुस्त करून सुरक्षित करण्यात यावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. इतकेच नव्हे, तर संध्याकाळपर्यंत काम पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला घटनास्थळीच उभे करीन, असा सज्जड दमही त्यांनी दिला.
या घटनेमुळे केडीएमसीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरी सुविधांबाबत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा त्रुटींवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.