मुंबईत सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून उद्योगपतीला लाखोंचा गंडा; महिला क्रिकेटपटूसह तीन जणांना मुंबईत अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून उद्योगपतीला लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला क्रिकेटपटूने आपल्या साथीदारांच्या मदतीने उद्योगपतीकडून तब्बल ६३ लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संबंधित महिला क्रिकेटपटू आणि तिच्या भावासह आणखी एका आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी फरखांदा खान ही जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू असल्याची माहिती आहे. तिच्यासोबत तिचा भाऊ बाझिल अझीझ खान आणि साथीदार इम्तियाज वाणी यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींना दिल्ली आणि श्रीनगर येथून ताब्यात घेण्यात आले.
दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातील २८ वर्षीय उद्योगपती २०२४ मध्ये पश्चिम उपनगरात राहत असताना त्याची ओळख फरखांदाशी झाली. काही काळातच दोघांमध्ये जवळीक वाढली. याच नात्याचा फायदा घेत आरोपींनी पुढे ब्लॅकमेलिंगचा डाव आखल्याचे समोर आले आहे.तपासानुसार, फरखांदाने उद्योगपतीकडे पैशांची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, तिने मोबाईलवरील चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर तिने टप्प्याटप्प्याने पैसे उकळले. सुरुवातीला २३ लाख रुपये आणि त्यानंतर आणखी ४० लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.
उकळलेली रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली. काही रक्कम इम्तियाज वाणीच्या खात्यात तर काही पैसे आरोपींच्या कुटुंबीयांच्या खात्यांत जमा करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. फरखांदाचा भाऊ बाझिल हा देखील उद्योगपतीला सतत धमक्या देत होता.या प्रकरणात आरोपींनी उद्योगपतीला कशा प्रकारे जाळ्यात अडकवले, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. मुंबई पोलिस आरोपींची कसून चौकशी करत असून, या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.