सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी, तब्बल २२ किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर संशय
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये सुमारे २२ किलोची तफावत आढळली असून, या ‘चांदी अपहार’ प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रार केली होती. जुन्या नोंदींनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठी ४०६ किलो चांदी वापरण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष मोजणी केली असता केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे आढळले. अशा प्रकारे सुमारे २२ किलो ४९० ग्रॅम चांदी गायब असल्याचे उघड झाले आहे.
२५ मार्च २०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसेच विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवले आहे. अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी यासंदर्भात लेखी आदेश काढले आहेत. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.