ठाणे स्टेशनजवळ ‘शिवशाही’ला भीषण आग, बस जळून खाक; सुदैवाने १५ प्रवाशी बचावले
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे रेल्वे स्टेशनवरील सेटीस ब्रिजवर शिवशाही बसला भीषण आग लागल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे उन्हामुळे वातावरण तापलं असून प्रवाशांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहेत, त्यातच ठाणे स्टेशनवर शिवशाही बसला अचानक आग लागल्याने ही आग कशाने लागली याची चर्चा होत आहे.बसला आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले.
बसच्या खालील बाजूस इंजन आणि डिझेल टाकीजवळ ही आग लागल्याने बसने पेट घेतला, त्यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली.सदर शिवशाही बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे रवाना होत होती, दरम्यान बसला आग लागल्याने प्रवाशांसह सर्वांचाच खोळंबा झाला आगीचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे.ही शिवशाही बस ठाण्यात आली, तिथून बोईसरला जाणार होती. मात्र, ठाणे स्टेशनजवळ आल्यानंतर बस अचानक बंद पडली. बंद पडल्यानंतर खालून आग लागल्याचं दिसून आलं.
बसमध्ये एकूण १५ प्रवासी होते, मात्र आग लागल्याचे समजताच प्रवाशांनी बसमधून बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सध्या बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.बसला आग लागल्यानंतर स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेतली, काहींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, अग्निशमनच्या जवानांना मदतीचा हात दिला.अग्निशनच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या मोठ्या प्रेशरने बसवर मारा केला.अग्नशमन दलाच्या सर्व जवानांनी शर्थीने प्रयत्न केले, पण बसने मोठा पेट घेतल्यामुळे बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचं पाहायला मिळालं. बसचा सांगाडाच तिथे दिसून आला.