वरळी म्युनिसिपल मार्केटमध्ये अमली पदार्थांची खुलेआम विक्री; नागरिकांत भीतीचे वातावरण

वरळी म्युनिसिपल मार्केटमध्ये अमली पदार्थांची खुलेआम विक्री; नागरिकांत भीतीचे वातावरण

सुधाकर नाडार 

मुंबई : वरळी परिसरातील सिटी बेकरीलगत असलेल्या म्युनिसिपल मार्केटमध्ये खुलेआम गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. औरम इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या या गजबजलेल्या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या प्रकारामुळे परिसराच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, या कथित गैरप्रकारामागे कृष्णा भंडारी हा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे, तर नादिम कुरेशी याच्यावर प्रत्यक्ष गांजा विक्रीचा आरोप आहे. येल्लिया नावाच्या आणखी एका व्यक्तीचा या नेटवर्कशी संबंध असल्याचेही बोलले जात असून तो संपूर्ण कारभार सांभाळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दररोज शेकडो महिला व कुटुंबीय या मार्केटमध्ये मासे व इतर आवश्यक वस्तू खरेदीसाठी येतात. अशा ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नशेच्या आहारी गेलेले काही जण येथून पदार्थ घेऊन जात असल्याने भविष्यात चोरी, लूटमार यांसारख्या गुन्ह्यांत वाढ होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय, संबंधित विक्रेते स्वतःला ‘मॅनेज’ असल्याचे सांगत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला असून त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon