मुंबईत बनावट ‘महानगर गॅस’ फाइल रॅकेट उघड; झारखंडमधील तिघांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘महानगर गॅस’शी संबंधित फाइल तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला असून, झारखंडमधून आलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गॅस वितरणाशी संबंधित गैरव्यवहारांचे जाळे उघडकीस आले आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपासात आरोपी बनावट ‘एपी’ (AP) फाइल तयार करून विविध ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचे समोर आले. अटक आरोपी झारखंड येथून मुंबईत येऊन बनावट कागदपत्रे तयार करत होते.
आरोपींकडून महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य जप्त करण्यात आले असून, या रॅकेटमागील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला असून, गॅस वितरण प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे घोटाळे समोर येत असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. नागरिकांनीही व्यवहार करताना कागदपत्रांची खातरजमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.