नेवाळी नाका येथे भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; परिसरात तणाव

नेवाळी नाका येथे भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; परिसरात तणाव

पोलीस महानगर नेटवर्क 

कल्याण : नेवाळी नाका परिसरात भाजप पदाधिकारी विशाल जुगनू जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ वादातून हा प्रकार चिघळल्याची माहिती समोर येत आहे.

जाधव यांच्या कार्यालयासमोर हातगाडीवर चादर विक्री करणाऱ्या मुन्ना पाल याला प्रमोद भोईर याने मारहाण केल्याच्या घटनेतून वादाची ठिणगी पडली. हा वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जाधव यांचे भाऊ अविनाश पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.

यामुळे संतप्त झालेल्या भावेश भोईर, प्रमोद भोईर, भगवती यादव, ऋषीकेश पवार आणि त्यांच्या १० ते १५ साथीदारांनी संगनमताने हल्ला चढविल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात विशाल जाधव आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. तसेच पिस्तूलसदृश हत्याराने डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आल्याचे सांगितले जाते.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर उभे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon