कोल्हापुरात सावकारीच्या जाळ्यात महिलेला ब्लॅकमेल; अत्याचार प्रकरणी संशयित अटकेत

कोल्हापुरात सावकारीच्या जाळ्यात महिलेला ब्लॅकमेल; अत्याचार प्रकरणी संशयित अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क 

कोल्हापूर : व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने महिलेला शारीरिक संबंधांसाठी भाग पाडत अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर शहरानजीक उघडकीस आला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी संशयित अमित सावंत याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने घरगुती अडचणींमुळे सावंतकडून सुमारे दोन लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्याचा फायदा घेत सावंतने महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. महिला घरी एकटी असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार करून अश्लील फोटो व व्हिडिओ चित्रित केले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वेळोवेळी हॉटेल व कारमध्ये तिचा छळ केल्याचा आरोप आहे.

पीडित महिलेने नोव्हेंबर २०२५ पर्यंत व्याजासह संपूर्ण रक्कम परत केली तरीही सावंतने अधिक पैशांची मागणी सुरू ठेवत तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आरोपीने महिलेचे अश्लील व्हिडिओ इतरांकडे पाठविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या जावयाला हॉटेलवर बोलावून मारहाण केल्याची तक्रार आहे.

दरम्यान, आरोपीच्या मोबाईलमध्ये २०० ते ३०० अश्लील व्हिडिओ असल्याचा गंभीर दावा पीडित महिलेने केला आहे. या प्रकाराची माहिती आरोपीच्या पत्नीला असल्याचाही आरोप करण्यात आला असून या प्रकरणाला आणखी वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सततच्या छळाला कंटाळून अखेर महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon